वैयक्तिक वित्त व्यवस्थापन कसे कराल. (Personal Finance in Marathi ) : समाजात सामन्यात तीन प्रकारचे आर्थिक गट दिसतात. एक गट तसा श्रीमंत, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुदृढ, आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत गलेलठ्ठ असणारा, दुसरा श्रीमंत नसणारा परंतु अगदीच आर्थिक ओढाताण किंवा तटपुंजं उत्पन्न वगैरे हाल सोसणाराही नसतो म्हणजे बऱ्यापैकी आर्थिक स्त्रोत असणारा आणि आता तिसरा गट, हा गट म्हणजे अगदी गरीब वगैरे म्हणावं अशा प्रकारात मोडतो. म्हणजे अगदीच किरकोळ उत्पन्न किंवा हातावर पोट असणारा असं काहीसं म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचा.
आता गर्भश्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय, अतिगरीब असे काही प्रकार तुमच्या मनात येतील पण ते झाले वरील गटांचे उपगट, पण आपला आजच्या लेखाचा विषय श्रीमंती गरिबीची व्याख्या, स्पष्टीकरण वगैरे नाहीये.
भविष्याची बेगमी करण्याची माणसाची प्रवृत्ती तशी आदिम काळापासूनच, फक्त बदलत्या काळानुसार त्याच्या बचतीच्या आणि खर्च करण्याच्या पद्धती आणि सवयी मध्ये सुद्धा बदल होत गेले.आज आपण बरेचदा बघतो कि अगदी पगार म्हणा किंवा उत्पन्न, ते अगदी लाखोमध्ये असणारे सुद्धा आपलं उत्पन्न पुरेसं नाही अशी तक्रार करत असतात. यामधील बरेचजण कर्जांचे हफ्ते, आपल्या आऊटिंग, खाण्याच्यासवयी त्यात होणारा खर्च, क्रेडीट कार्ड्सचे बिलं या सगळ्या देण्याशी झगडत असतात. बऱ्याच जणांचं सांगणं असतं कि अगदी काही वर्षांपूर्वी अगदी थोडक्या हजारांत भागणाऱ्या आम्हाला आता लाख रुपयेसुद्धा कमी पडतात.
त्याच वेळी फारच कमी असेही आहेत ज्यांचं आजही हजारात कोणत्याही अवास्तव काटकसरी शिवायही उत्तम चाललेलं असतं.
असा काय फरक असतो या दोन गटांमध्ये ?
तर फरक आहे वैयक्तिक वित्त व्यवस्थापन म्हणजेच पर्सनल फायनान्स समजून घेण्यातला.
खरं तर आमच्या मते या विषयाचा शालेय शिक्षणक्रमात समावेश केला जावा. कारण आयुष्यभर खऱ्या अर्थाने प्रत्येकाचा या विषयाशी येनकेन प्रकारे संबंध येत राहतो आणि अज्ञानामुळे आपल्याला त्या-त्या वेळचे आर्थिक प्रश्न योग्य प्रकारे हाताळता येत नाहीत.
आयुष्याची चार भागात विभागणी असते , पाहिलं ते बालपण , नंतर किशोर ते युवा हा कालखंड म्हणजे आमच्या मते साधारणता 16 ते 25 वयोगट. त्यानंतर येतो खऱ्याअर्थाने आर्थिक संघर्षाचा काळ, म्हणजे 26 ते 50 आणि यापुढील कालखंड मात्र आम्ही निवृत्ती किंवा निर्वाणीचा काळ न म्हणता मजेचा काळ असं म्हणू कारण या वयात अगदी कोणताही टेन्शन न घेता जगायचंय.
हे कसं शक्य आहे ?
सुरवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या कि उत्तम वैयक्तिक वित्त व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्ही अगदी संपूर्ण अर्थशास्त्र शिकायची गरज नाही.कारण इथे तुम्हाला ना जगाची गरिबी दूर करायचेय ना देशाचे आर्थिक प्रश्न सोडवायचे आहेत. इथे तुम्हाला फक्त बऱ्यापैकी आर्थिक शहाणपण अंगी बाणवायचं आहे जे तुम्हाला तुमचे वैयक्तिक आर्थिक निर्णय घेताना उपयोगी पडणार आहे.
तर मुद्दा क्रमांक एक ,
समजून घ्या तुमच्या पैशाचे मार्ग : या बाबत सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या कडे पैसा येतो कुठून आणि तो जातो कुठे हे समजून घ्या आणि मग त्याचा वापर निश्चित करा. म्हणजे तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग किती आहेत ? जर नोकरी हा एकाच उत्पन्नाचा स्त्रोत असेल तर तुम्ही कठोर व्यवस्थापन करायला हवंच तसंच अगदी किरकोळ का होईना पण उत्पन्नाचे स्त्रोत वाढवता येतील का यासाठी प्रयत्न करावेत. आजच्या टेक्नोलॉजी आणि डिजिटल जगात अनेक मार्ग आहेत जे थोडंफार ‘वरजम्यासाठी’ ( ‘वरखर्च’ या शब्दाला आमचा विरुद्धार्थी शब्द समजून चला ) तरतूद करू शकतात.
आरोग्य आणि आणीबाणी घडवू शकतं अर्थपात : इंग्रजी मध्ये “हेल्थ इज वेल्थ ” अशी अगदी वास्तववादी म्हण आहे. अब्जावधीची संपत्ती असेल पण जर तुम्हीच लुळे पांगले असाल तर त्या संपत्तीचा काय उपयोग, आणि समजा पैशाच्या मागे लागून आरोग्याची आबाळ होऊन एके दिवशी आयुष्य अकाली संपणार असेल तर मग ते पैसे विषच झाले ना ?
हे सांगण्याचा हाच कि ‘दात असतील तरच तुमच्याकडे असलेल्या चण्यांना अर्थ आहे’ म्हणूनच आरोग्याची योग्यती काळजी घेतानाच त्याच्या संबंधित काही तरतुदी असाव्यात. उदाहरणार्थ संपूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा असणे हि गरज आहे. त्याच बरोबर कॅन्सरसारख्या गंभीर आणि खर्चिक आजारांच्या दृष्टीने महत्वाचं ठरणारं विशिष्ट विमा कवच सुद्धा असणे महत्वाचं आहे.
आरोग्य, आजार याच बरोबर आपलंआयुष्याला सुद्धा विम्याचं कवच असावं. म्हणजेच एक मुदत विमा ( टर्म इंश्योरन्स ) हवाच. घरातील नवरा – बायको या दोघांनी मुदत विमा काढलेला असणे उत्तम.
जमा व खर्चाची वेळोवेळी नोंद : अगदी बारीक-सारीक जमा खर्चाची वेळोवेळी नोंद करावी. बरेचदा थोड्या-थोड्या रकमेचा खर्च आपला एखाद्या बाबीवर महिन्याकाठी किती अवास्तव आहे हे या द्वारे लक्षात येऊ शकतं. लक्षात घ्या थेंबे थेंबे जर तळं साचत असेल तर थेंबा थेंबाचा उपसा होण्याने तेच तळं नष्टही होऊ शकतं. आणि याच आधारावर दर पुढील महिन्याचे बजेट आखणी करा. यात तुमच्या येणाऱ्या उत्पन्नातील किती हिस्सा कशा करिता असेल याचा निर्णय घेता येतो.
बिलांचा वेळच्या वेळी भरणा करा. क्रेडीट कार्ड वापरात असाल तर लक्षात घ्या , ती एक सोय आहे त्यास व्यसन बनवू नका.
बचत आणि गुंतवणूक : बचत आणि गुंतवणूक या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी एकमेकांशी अत्यंत जोडलेल्या आहेत कारण बचतीशिवाय गुंतवणूक होऊच शकत नाही. किंबहुना, बचत हि गुंतवणुकीची आई आहे असं समजा. दर महिन्यास तुम्ही उत्पन्नातील अमुक एक रक्कम वेगळी काढू शकत असाल तरच तुम्ही त्या रकमेचा गुंतवणुकीसाठी विचार करू शकाल. म्हणून गुंतवणुकीच्या आधी बचतीचं प्रयोजन येतं.
गुंतवणूक करताना तीचा कधी आणि कसा उपयोग करणार याचा विचार आधी हवा. नाहीतर वयाच्या पंचेचाळीशीत पस्तीस वर्षे मुदतीची विमा पॉलीसी घेऊन त्याला गुंतवणूकीची ‘ सोय” म्हणता येईल पण ती सोय आपली नसते इतकं नक्की. गुंतवणूक नियोजन करताना आपलं वय, उत्पन्न, जीवनशैली, गुंतवणुकीचे प्रयोजन म्हणजे योग्य त्या वेळी गुंतवणूक कशासाठी वापरली जाणार उदाहरणार्थ , निवृत्ती, मुलांचे उच्चशिक्षण व लग्नकार्ये, घर मालमत्ता निर्मिती याबाबत स्पष्टता असावी.
गुंतवणुकीसाठी आज आज पर्याय उपलब्ध आहेत. सरकारी रोखे, एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन स्कीम, पीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी, सोने ( सोन्यात अनेक प्रकारे गुंतवणूक करता येते ) म्युच्युअल फंड्स (हा विषय खोल आहे इक्विटी, डेब्ट वगैरे ), विविध ईटीएफ, मुदत ठेव म्हणजेच एफडी (यामधील गुंतवणुकी दरम्यान महागाई दर विचारात घ्यावा) स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट ) आणि थेट शेअर मार्केटमधील कंपन्यांच्या समभागात (डायरेक्ट इक्विटी ) गुंतवणूक आणि सध्याचा अगदी गाजणारा पण वादग्रस्त अशी क्रिप्टोचलन तसेच एनएफटी सुद्धा.
वरील पर्याय अगदी सविस्तर देण्याचा उद्देश हाच कि आज अनेक पर्याय आहेत ज्यांच्या बाबत साधक-बाधक विचार करून गरज वाटल्यास गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊन संतुलित प्रकारची गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करतेवेळी आपली सध्याची गरज आणि आणीबाणीसाठीची तरतूद या बाबी सर्वप्रथम विचारात घ्याव्यात.
लक्षात ठेवा , गुंतवणुकीत धर-सोड वृत्ती नको आणि त्यासाठीच गुंतवणुकीची रूपरेषा ठरवूनच गुंतवणूक करा.
How to manage personal Finance
चैनीच्या वस्तू भौतिक सुखाची जीवनशैली : यात वावगं काहीच नाही. चांगली भरभक्कम आर्थिक स्थती असेल तर यात वावगं काहीच नाही पण आर्थिक ताकत नसताना अगदी तडजोड ओढाताण करून चैनीच्या गोष्टी घेणे म्हणजे भविष्यासाठी आर्थिक संकट तयार करण्यासारखं.
लक्षात घ्या , महागड्या वस्तू दोनच कारणाने घेतल्या जातात ,
एक, चैन म्हणून
आणि दुसरं , गरज म्हणून.
म्हणजे आयफोनचे लेटेस्ट मॉडेल किंवा कार घेण्याची तुमची इच्छा असेल तर स्वताला एक प्रश्न नक्की विचारा कि “सध्याच्या माझ्या व्यावसायिक आयुष्यात या गोष्टी मला गरजेच्या आहेत का ?” तुमचा उद्योग व्यवसाय बहरू लागलेला असेल, नोकरीत उच्च स्थानावर तुम्ही विराजमान असाल तर या प्रश्नाला तुमचं उत्तर ‘होय’ असंच असेल. पण जर तुम्ही अजूनही आर्थिकदृष्ट्या झगडत असाल तर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच असेल.
याकरिता तुम्ही महागड्या वस्तू घेताना ती घेण्याची गरज तुम्हाला निर्माण झालेय या आर्थिक आणि व्यावसायिक टप्प्यावर तुम्ही आलेले आहात का याची चाचपणी करा.
मुलांमध्ये गुंतवणूक रुजवा : मुलांना विविध प्रेरणादायी गोष्टी सांगताना पैशाची गोष्ट सुद्धा आवर्जून सांगा. वय वर्षे पाच- सहा वयोगटात असताना मुलांना दर दिवसाला अगदी एक – दोन रुपये (हि रक्कम किरकोळ असणे उत्तम ) देतानाच अभ्यास, चांगल्या सवयी यासाठी मुलांना बक्षीस म्हणून अतिरिक्त १-२ रुपये देत राहा आणि याचा उपयोग त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या आवडीच्या गिफ्टसाठी थोडीशी (योगदान ) रक्कम त्यांच्याकडून घ्या. यामधून त्यांना पैशाचं महत्व समजण्यास सुरवात होईल आणि त्याच बरोबर चांगल्या सवयी त्यांच्या अंगी बाणवल्या जातील.
आढावा आणि सिंहावलोकन : गुंतवणुकीचा निर्णय घेणे, इतकीच हि बाब मर्यादित नाही. गुंतवणुकीचा वरच्यावर आढावा घेत राहणे अत्यंत महत्वाचं असतं. कारण वेळोवेळी सरकारी धोरणं बदलत असतात, ओद्योगिक चढ उतार येत असतात, नवनवीन तंत्रज्ञान येत असतं तसंच जुनं कालबाह्य होत असतं. या सर्वांचा आपल्या गुंतवणुकीवर परिणाम होत असतो. आणि यासाठीच वेळोवेळी गुंतवणुकीचा आढावा घेणे गरजेचे आहे. घर विकत घेऊन राहणे किफायतशीर कि भाडेकराराने ? अशा गोष्टींचा सुद्धा वेळोवेळी परिस्थितीवश विचार करून त्यातील व्यवहार्यता तपासून योग्य तो निर्णय घेणे उत्तम ठरते.
वित्तसाक्षर व्हा : तुमचा आर्थिक बुध्यांक केवळ ‘माझा पगार -उत्पन्न, माझा खर्च’ इथपर्यंत मर्यादित ठेवू नका. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण (रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट), वेळो-वेळी बदलणारी करसारणी (टॅक्स स्लॅब ), अर्थसंकल्प, जीएसटी आकडेवारी, महागाई निर्देशांक ( दर ), जीडीपी, आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किंमतीत होणारे चढउतार या बाबींचा सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी थेट दिसत नसला तरी अत्यंत निकटचा संबंध आहे त्यामुळे या संकल्पना समजून घ्या. या संदर्भातील घटना -बातम्या यावर नजर ठेवा. उदाहरणार्थ पेट्रोल दर वाढले म्हणजे फक्त तुम्हा आमच्या गाडीत टाकायच्या पेट्रोलच्या बजेटमध्ये वाढ होते इतकीच हि बाब सामान्य नसते. तर दळणवळण वाढल्याने महागाई ते आयात निर्यात आदि घटकांवर सुद्धा याचा परिणाम होत असतो.
वैयक्तिक वित्त व्यवस्थापन (Personal Finance in Marathi ) जितकं लवकर आयुष्य तितकंच सुखकर होतं. पण जर अजूनही तुम्ही या विषयाला सुरवात केली नसेल ‘शुभस्य शिघ्रम’ या न्यायाने आताच सुरु करा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा.